मुंबई | छत्रपती संभाजीनगरातील अविष्कार कॉलनीत २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृतक तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे असून ती फार्मास्युटिकल सायन्सची विद्यार्थिनी होती. काही महिन्यांपूर्वीच तिने वाळूज औद्योगिक परिसरातील एका औषध कंपनीत नोकरी सुरू केली होती.
आई-भावाला लिहिली सुसाइड नोट
मृत्यूपूर्वी निकिताने आई व भावाला उद्देशून सुसाइड नोट लिहली आहे. “मम्मी, भाऊ, दादा-दादी मला माफ करा. बाबा देखील मला सोडून गेले, मी आता जगून थकले आहे” असे भावनिक उद्गार तिने नोंदवले. आपल्या भावाला आईची काळजी घेण्याची विनंतीही तिने केली आहे.
जेवणासाठी बोलावलं पण उत्तर मिळालं नाही
राहुरी तालुक्यातील मूळची असलेली निकिता दोन मैत्रिणींसोबत अविष्कार कॉलनीत राहात होती. रविवारी तिच्या सहेल्या गावाला गेल्याने ती एकटी होती. रात्री दहा वाजता मित्रांनी तिला जेवणासाठी बोलावले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. निकिताच्या सुसाइड नोटमध्ये मृत्यूचं नेमकं कारण नमूद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.