अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढणार असल्याचं शेकाप नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. “शेकापने ज्यांना मोठं केलं त्यांनी गद्दारी केली. पण त्या गद्दारांना शून्य करण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे,” असा हल्लाबोल करत त्यांनी जिल्ह्यात पुन्हा लाल बावटा फडकवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिलं.
चेंढरे येथे शेकापची बैठक
चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात शेकापची रायगड जिल्हा चिटणीस मंडळ व नवनिर्वाचित पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक पातळीवरील निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रस्तरावर पोहोचण्यावर भर द्यावा, असं सांगितलं.
“मनात चीड ठेवून सज्ज व्हा”
“शेकापची साडेचार लाख मते आहेत, हे निवडणुकांमध्ये सिद्ध झालं आहे. आता जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी जिद्दीने आणि मनात चीड ठेवून काम करा,” असं पाटील म्हणाले