मुंबई/ठाणे – राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा पुढे करण्याची मोहीम सुरू झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. त्याचबरोबर प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरही अशाच जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.
सरकारने मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसमितीने घेतलेल्या निर्णयानंतर जरांगे यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. यानंतर लगेचच भाजपकडून ‘देवाभाऊ’ मोहिम पुढे आल्याचं स्पष्ट होत आहे.
या बॅनरवर “कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच – देवेंद्रजी फडणवीस” असं लिहिलं आहे. तसेच “छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार, ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा – देवाभाऊ” असाही मजकूर देण्यात आला आहे.
मात्र हे पोस्टर नेमके कुणी लावले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीदेखील ही बॅनरबाजी भाजपकडूनच राबवली गेल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं –
“श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकारने एकत्रितपणे केलं आहे. देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून पुढे काम करणार आहोत. सर्वसामान्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.”
राजकीय वर्तुळात या हालचालींना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्व दिलं जात आहे.