शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ‘अर्धे पाकिस्तानी’ अशी जहरी टीका केली होती. राऊतांच्या या वक्तव्यावरून राज्यात मोठी खळबळ उडाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
मिटकरी यांनी अत्यंत संतप्त भाषेत राऊतांवर घणाघाती हल्ला चढवत म्हटलं की, “संजय राऊतांचा बापच दाऊद इब्राहिम असल्याने ते अशी भाषा वापरतात. अजित पवारांवर बोलायची राऊतांची लायकीच नाही. त्यांच्या जीभेला हासडले पाहिजे.”
👉 नेमकं काय म्हणाले राऊत?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळण्याला विरोध करताना राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. “अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त आहे, ते अर्धे पाकिस्तानी आहेत. जर महाराष्ट्रातील एका मंत्र्यांची ही भाषा असेल, तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची नाही,” असे ते म्हणाले होते.
👉 अजित पवारांचं स्पष्टीकरण
खेळाकडे खेळाच्या नजरेतून पाहणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. तसेच, विरोधक फक्त सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी मुद्दाम भावनिक विषयांचा वापर करतात, अशी टीकाही त्यांनी केली होती.