मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्यातील वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “याला तणाव म्हणत नाहीत, दादागिरी म्हणतात,” असा टोला राऊतांनी लगावला. बेकायदेशीर काम करणाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन करणं म्हणजे ते त्यांच्या जवळचेच लोक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बेकायदेशीर कामांना संरक्षण देण्याचा प्रयत्न?
संजय राऊत म्हणाले,
“बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. याचा अर्थ ते त्यांचीच माणसं होती. पोलिसांना कारवाई थांबवायला सांगणं म्हणजे नियमांबाहेरचं काम. याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात.”
राऊतांनी अजित पवारांच्या भाषणातील मुद्दाही आठवला. “अजित पवार नेहमी म्हणतात मी नियमबाह्य काही करत नाही. मग या घटनेत पोलिसांना बेकायदेशीर कामांना संरक्षण का द्यावं लागलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं?
या प्रकरणात IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना लक्ष्य करणाऱ्या आमदारांच्या पत्रावरही राऊतांनी टीका केली.
“त्या महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? नियम आणि कायदा सांगणं हेच त्यांचं काम आहे. उपमुख्यमंत्र्यांना कायद्याचं भान करून दिलं म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जातेय. हे दुर्दैवी आहे.”
“90% मंत्रिमंडळ खाली जाईल”
संजय राऊतांनी सरकारवर मोठा घणाघात करताना म्हटलं –
“नैतिकतेवर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील 90% मंत्रिमंडळ घरी जाईल. शिंदे गटाचे सर्व मंत्री पदावर राहणार नाहीत. अजित पवारांचे मंत्रीसुद्धा टिकणार नाहीत. प्रत्येकावर आरोप आहेत, प्रत्येक जण बेकायदेशीर कामांत गुंतलेला आहे.”