पूजा खेडकर प्रकरणानंतर अंजना कृष्णांच्या नेमणुकीवरही संशय?
मुंबई :
सोलापूरच्या कुर्डू गावातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणातून राज्यात मोठा वादंग उफाळलाय. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला पोलीस अधिकारी IPS अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉलवरून दम दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उलट अंजना कृष्णांच्याच नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नवा स्फोटक मुद्दा उचलला आहे.
“पूजा खेडकरप्रमाणेच घोळ” – मिटकरी
अकोल्यात बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “अंजना कृष्णा या मग्रूर अधिकारी आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नाही असं म्हणणं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. पूजा खेडकर प्रकरणात जसा गोंधळ झाला, तसाच गोंधळ अंजना कृष्णांच्या UPSC निवड प्रक्रियेत झाला असावा, अशी आमची शंका आहे. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे.”
IPS अंजना कृष्णा कोण?
मूळ केरळमधील त्रिवेंद्रमच्या
UPSC 2023 मध्ये 355 वा क्रमांक, IPS केडर
सुरुवातीला केरळमध्ये एसीपी पदावर काम
सध्या सोलापूर ग्रामीण पोलिसात नियुक्ती
प्रोबेशन काळातच करमाळा व माढा येथे अवैध व्यवसायाविरोधात मोठी कारवाई
नुकत्याच मुरूम उपसा प्रकरणात ठाम भूमिका घेतल्याने चर्चेत
पवारांच्या दबावाखाली कारवाई?
मिटकरींच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटलाय. अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, तर दुसरीकडे IPS अंजना कृष्णांच्या नेमणुकीवरच प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसने बचावात्मक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होतंय.