बारामती – बारामतीत काल ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा पार पडल्यानंतर आज त्याच ठिकाणी ओबीसी समाजाकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
जर प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरंदरमध्ये घेराव घालून जाब विचारला जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
जरांगे यांच्या वक्तव्याविरोधात संताप
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणादरम्यान धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांचे कार्यकर्ते देखील अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचं सांगितलं जातं.
“मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचे व्हिडिओ आम्ही प्रशासनाला दिले आहेत. तरीदेखील कारवाई होत नाही. 1 तारखेपासून आम्ही मागणी करत आहोत, 5 तारखेला भव्य मोर्चा काढला. पण सरकार गुन्हा दाखल करत नाही. नेमका कोणत्या दबावामुळे हा विलंब होतोय, हे समजत नाही,” असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.
पुरंदरमध्ये फडणवीसांना जाब विचारणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमाजी नाईक जयंतीनिमित्त पुरंदरला येणार आहेत. त्यावेळी त्यांना जाब विचारण्याची तयारी ओबीसी समाजाने केली आहे.
“तुम्ही आमच्या राजाजवळ नतमस्तक होता, पण दुसरीकडे आमच्यावर अन्याय होत आहे. आमचं सरकार असतानाही मनोज जरांगे यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना थेट विचारणार आहोत,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
बारामती व परिसरात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत असून, आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते.