konkandhara.com

कोकणची बातमी

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून तब्बल ५ लाख ९६ हजारांहून अधिक प्रवाशांनी एसटीद्वारे सुखरूप प्रवास केला. या विशेष सेवेतून एसटीला २३ कोटी ७७ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसनी १५,३८८ फेऱ्या पूर्ण केल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “गणेशोत्सवासाठी आप-आपल्या गावी पोहोचलेल्या लाखो कोकणवासीयांचा सुखरूप प्रवास शक्य करून दाखवणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे अधिकारी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.” एसटी महामंडळाने या प्रवाशांची अपघात विरहित सुरक्षित वाहतूक करून नवा इतिहास रचला आहे.

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न Read More »

महिला बचत गटांसाठी शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर व महिला मेळावा – मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने महिला बचत गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), रायगड यांच्या वतीने रोहा तालुक्यातील मौजे वरसे येथे “शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर व महिला मेळावा” आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. आपल्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून कार्यरत असल्याचे सांगत, महिलांनी त्या योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या कर्जांचे धनादेश वितरित करण्यात आले. याशिवाय, ग्राम पातळीवर महिला बचत गटांना सहकार्य करणाऱ्या पुरुष बांधवांना “सुधारक सन्मान पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ज्येष्ठ ग्रामस्थ, माता-भगिनी, ग्रामपंचायत पदाधिकारी, माविमचे अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला बचत गटांसाठी शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर व महिला मेळावा – मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती Read More »

रत्नागिरीत बाप्पा रील स्पर्धा २०२५ पारितोषिक वितरण समारंभ; मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

रत्नागिरी – कोकणची संस्कृती, गणपती सण आणि कलात्मक परंपरेला उभारी देणाऱ्या “बाप्पा रील स्पर्धा २०२५” या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्तानं उदय सामंत यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकारनं मराठी चित्रपटसृष्टीसाठी देशातील पहिलीच इन्सेंटिव्ह स्कीम आणली असून कोकण, विदर्भ, मराठवाडा येथील निर्माते, कलाकार आणि टेक्नीशियन यांना मोठं प्रोत्साहन मिळणार आहे. वैभव मांगले यांच्या संकल्पना व संघर्षाच्या प्रवासाचा गौरव करण्यात आला. यावेळी वीणाताई जामकर, माजी आमदार राजन साळवी, बंड्याशेठ साळवी, राजेंद्र महाडिक, सुदेश मयेकर, परशुराम कदम, विजय खेडेकर, शिल्पाताई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त सर्व कलाकार व सहभागींचं मनःपूर्वक अभिनंदन करून मराठी कला आणि संस्कृतीचा गौरव वाढविण्यात आला.

रत्नागिरीत बाप्पा रील स्पर्धा २०२५ पारितोषिक वितरण समारंभ; मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती Read More »

रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण!

रोह्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी ओळख मिळाली. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीनं पार पडलं. कलाकार सयाजी शिंदे व भरत जाधव यांनी दिलेली भाषणं रंगतदार ठरली. रोहा | रोहा शहराच्या सांस्कृतिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण शनिवारी अत्यंत उत्साहात पार पडलं. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत राज्याची मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे तसेच मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील मान्यवर अभिनेते सयाजी शिंदे आणि भरत जाधव यांनी हजेरी लावली. नव्या नाट्यगृहाच्या उद्घाटनावेळी रोहात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळालं. रोह्यातील नागरिक, स्थानिक कलाकार, सामाजिक संस्था, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मतं मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मान्य करत सांगितलं, “होय, उशीर झाला… पण हा उशीर माझ्या जबाबदारीतलाच आहे. ही माझी चूक आहे. पण आज नाट्यगृह उभं राहिलं आहे, हेच खरं समाधान आहे.” त्यांच्या या स्पष्ट कबुलीनं टाळ्यांचा कडकडाट झाला. मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकल्पाला मिळालेलं स्थानिक सहकार्य अधोरेखित केलं. त्यांनी सांगितलं की, रोहातील कला, साहित्य, रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी हे नाट्यगृह एक मोठं व्यासपीठ ठरेल. खासदार सुनील तटकरे म्हणाले, “ज्यांनी आधी टीका केली होती… तेच आता या नाट्यगृहाचे चाहते झाले आहेत. हीच खरी कामगिरी आहे.” कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव यांनी भावनिक शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, “हे नाट्यगृह म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठं दान आहे. इथून अनेक कलाकार घडतील, हीच खरी पुण्याई.” त्यांच्या भावनिक वक्तव्याने सभागृहात दाद मिळाली. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाट्यगृहात होणाऱ्या पहिल्या नाटकाची घोषणा करत सांगितलं की, “घाशीराम कोतवाल” या सुप्रसिद्ध नाटकाने रोहाच्या रंगमंचावर पहिली घंटा वाजेल. या घोषणेनं प्रेक्षकांत उत्सुकता निर्माण झाली. उद्घाटन समारंभात स्थानिक कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण रंगतदार केलं. नाट्यगृहाच्या भव्य वास्तूचं कौतुक सर्वांनीच केलं. आधुनिक ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना आणि आसनव्यवस्था यामुळे हे नाट्यगृह कोकणातील एक आदर्श सांस्कृतिक केंद्र ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात आज उत्साहाचं आणि भावनांचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हे भव्य नाट्यगृह रोह्याच्या लोकांच्या स्वाधीन करण्यात आलं. या सोहळ्यात मंत्री अदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, “हे नाट्यगृह उभं राहणं सोपं नव्हतं. प्रत्येक टप्प्यावर नवनव्या अडचणी, आपत्ती, संकटं समोर आली. पण आम्ही हार मानली नाही. सर्व अडथळ्यांचा सामना करत, टीका-टिप्पण्यांना उत्तर देत आज हे सभागृह पूर्णत्वास आलं आहे. ही फक्त माझीच नाही, तर रोह्याच्या जनतेची जिद्द आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. स्थानिक नागरिक, कलाकार आणि मान्यवर यांनी नाट्यगृहाचं महत्त्व अधोरेखित करत मंत्री तटकरे यांचे आभार मानले. रोहा शहराला या नाट्यगृहामुळे एक वेगळीच सांस्कृतिक ओळख मिळणार आहे. स्थानिक कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. कला आणि संस्कृतीला चालना देणारी ही पायरी, रोहा शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा नवा अध्याय लिहील, यात शंका नाही.

रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण! Read More »

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक

पाली (10 सप्टेंबर) – अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता विजयी झाले आहेत. 15 पैकी 9 मते मिळवत त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांचा पराभव केला. तर एक मत तटस्थ राहिले. सुरुवातीला तिरंगी लढतीचे चित्र होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत मेहता यांना पाठिंबा दिला. अखेरच्या क्षणी झालेल्या या राजकीय हालचालींमुळे भाजप-राष्ट्रवादी आघाडीला बळ मिळाले. निवडणुकीच्या निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा झाला. या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीला महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठता आला असून आगामी काळात पाली नगरपंचायतीचे राजकारण याच निकालाच्या छायेत ठरणार आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीच्या शाश्वत विकासाची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, भाजप नेते वैकुंठ पाटील, प्रकाशभाऊ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक Read More »

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा

म्हसळा : म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसची म्हसळा नगरपंचायतीत एकहाती सत्ता असून मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दोघांचेही अर्ज एकमेव दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदी फरीन बशारत आणि उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांना संधी देण्यात आली. या निवडीच्या वेळी शहराध्यक्ष रियाज घराडे, मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, तसेच नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा Read More »

रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचे लोकार्पण – उपमुख्यमंत्री अजित पवार, सयाजी शिंदे व भरत जाधव यांच्या शुभहस्ते

रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेते सयाजी शिंदे व भरत जाधव यांच्या शुभहस्ते पार पडल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नागरिक, कलारसिक, कलाकार आणि मान्यवरांनी या लोकार्पणाला हजेरी लावून नाट्यगृहासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज नाट्यगृहात रोहा व परिसरातील कलारसिक व कलाकारांसाठी हे नाट्यगृह हक्काचं व्यासपीठ ठरणार असून, राज्यभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी हे महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे. लोकार्पण सोहळ्यानिमित्त ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा विशेष प्रयोग रंगमंचावर सादर झाला. कलावंतांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नाटक, संगीत, नृत्य, व्याख्याने, कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम अशा विविध उपक्रमांमुळे या नाट्यगृहामुळं कला-संस्कृतीला नवा उत्साह व आयाम मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचे लोकार्पण – उपमुख्यमंत्री अजित पवार, सयाजी शिंदे व भरत जाधव यांच्या शुभहस्ते Read More »

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत १००% कामकाज पूर्ण

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत कामकाज १००% पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या यशस्वी कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले असून, सेवाकर्म्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. हा उपक्रम प्रशासनातील पारदर्शकता व कर्मचारी कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत १००% कामकाज पूर्ण Read More »

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ

रायगड | रायगड जिल्ह्यातील तळा व म्हसळा तालुक्यातील गावांना आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्राचे माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. चर्चेअंती संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केले की, पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे.

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” रायगडात सुरू – गावांच्या विकासासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

रायगड | राज्यभरात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय कार्यशाळा कुरुळ येथे पार पडली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासातील भूमिकेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत म्हणजे राज्य व केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. “समृद्ध पंचायतराज अभियान” सात घटकांवर आधारित असून गावांच्या स्वच्छतेसह जलसमृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले. लोकसहभागातून गावांचा विकास साधल्यास सर्व आघाड्यांवर यश मिळवता येईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, रोहयो मंत्री भरत गोगावले, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे तसेच जिल्हा परिषदेतील विविध खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” रायगडात सुरू – गावांच्या विकासासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न Read More »