संजय राऊतांचा कृपाल तुमाने यांच्यावर पलटवार : “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”शिवसेना आमदारांचे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने; संजय राऊत म्हणाले – “शिवसेना निष्ठावंतांची आहे
मुंबई | शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी दावा केला होता की उद्धव ठाकरे यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आणि दसऱ्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होईल. या विधानावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार करत तुमाने यांना खोचक टोला लगावला आहे. राऊतांचा हल्लाबोल संजय राऊत म्हणाले,“हे कोण बोलतंय? ज्यांचा आम्ही लोकसभेला दारूण पराभव केला. तुम्ही या लोकांना का महत्व देता? ही त्यांची निराशा आहे. आज शिवसेनेत जे आमदार, खासदार आहेत ते शुद्ध आणि निष्ठावंत आहेत. जे पैशाला विकले, ईडी-सीबीआयच्या धमक्यांना घाबरून गेले ते गेले. आता उरलेले हे खरी शिवसेना आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे.” “तुमचं नशीब फुटलंय” राऊत पुढे म्हणाले की,“ज्यांनी हे भाष्य केले ते पूर्वी शिवसेनेचे खासदार होते. आमच्याकडून निवडून आल्यानंतर त्यांचा स्वतःच्या मतदारसंघात पराभव झाला. मग त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेत आणलं. आता ते शिवसेना फुटणार असल्याचं सांगत आहेत. तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा.” राऊत यांनी असंही म्हटलं की भविष्यात शिंदे गटाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे आणि त्याबाबत चर्चा सुरू आहे.