दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर
मुंबई – येत्या दसरा मेळाव्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले आहेत. यंदाच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील स्टेजवर दिसू शकतात. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण इशारा दिला. “दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते,” असे सचिन अहिर म्हणाले. “दसरा मेळावा – न भूतो न भविष्यती” सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत सांगितले – “उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही फक्त दोन पक्षांची गरज नाही, तर राज्यासाठी आवश्यक आहे. दसऱ्याला कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम होतं. यावेळचा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ स्वरुपाचा असेल.” त्यांनी पुढे सांगितले की, राज आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांकडे कायम पाहत असतात. दोघं स्टेजवर एकत्र दिसतील का, हे सांगता येणार नाही. मात्र त्यांना आमंत्रित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महानगरपालिकेची लढाई आणि मराठी माणसाचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा उल्लेख करताना सचिन अहिर म्हणाले – “मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असेल. मी काँग्रेस-राष्ट्रवादीत 15 वर्ष होतो, पण महानगरपालिका उत्तम चालवू शकणारा पक्ष फक्त शिवसेना आहे, असं आम्हाला नेहमी वाटलं.” त्यांनी पुढे भर दिला – “मुंबईत मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र नेतृत्व करणे ही काळाची गरज आहे.”