गणरायाला निरोप देतानाही धाराशिवमध्ये राजकारणाचा ज्वालामुखी फूटला. विसर्जनाच्या मिरवणुकीत पुन्हा एकदा समोरासमोर आले – खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार पुत्र मल्हार पाटील. जिल्ह्यातील जुना वैर असलेला निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष आता नव्या पिढीत अधिक पेटताना दिसतोय.
तीन पिढ्यांचा वैर
धाराशिवचं राजकारण म्हणजे एक घराणं, दोन परंपरा आणि एक दीर्घकाळ धगधगत असलेला संघर्ष. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर – हे चुलत भाऊ पण राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी. 2006 मध्ये पवनराजेंची हत्या झाली आणि त्या प्रकरणात पद्मसिंह पाटलांवर आरोप झाले. त्यानंतर दोन्ही घराण्यातील वैर अधिकच गहिरं झालं.
राजकारणाचा रणांगण
पित्याच्या निधनानंतर ओमराजे राजकारणात आले आणि 2009 पासून त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना थेट टक्कर दिली. त्यानंतर जिल्ह्यात राजकारण दोन गटात विभागलं – निंबाळकर गट विरुद्ध पाटील गट. प्रशासनापासून निवडणुकांपर्यंत या संघर्षाचा प्रभाव स्पष्ट दिसतो.
पुढच्या पिढीतला संघर्ष
गेल्या काही वर्षांत या संघर्षात उतरलेत पाटील कुटुंबाची पुढची पिढी – मल्हार पाटील. वडिलांवर ओमराजेंनी टीका केली तेव्हा मल्हारांनी थेट पलटवार करत त्यांची ‘औकात’ काढली. प्रत्युत्तरादाखल ओमराजेंनीही थेट इशारा दिला – “राजकारणामुळे माझ्या वडिलांना संपवलं. आता तुमचं राजकारण संपवणार!”
निवडणुकीतून मिरवणुकीत
अलीकडच्या लोकसभा निवडणुकीतही हा वैर रंगला – मल्हार पाटलांच्या आई राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या होत्या तर त्यांच्या समोर होते ओमराजे निंबाळकर. आता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोघे पुन्हा समोरासमोर आले आणि धाराशिवकरांनी जुना ‘कलगीतुरा’ प्रत्यक्ष अनुभवला.
जनता मात्र हवालदिल
या सततच्या संघर्षात जिल्ह्याचा विकास मात्र मागे पडला आहे. राजकीय, कौटुंबिक वैर बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. “तुमचं भांडण बाजूला ठेवा, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुबुद्धी दे बाप्पा!” अशीच धाराशिवकरांची मनापासून प्रार्थना आहे.