दुबई |
आशिया कप 2025 मधील भारत–पाक सामना क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरला. भारतीय संघाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या वाढदिवशी पाकिस्तानवर विजय मिळवत सुपर-4 फेरीकडे मोठं पाऊल टाकलं.
14 सप्टेंबर हा सूर्यकुमारचा वाढदिवस असून, त्याने या विशेष दिवशी जबाबदारीची खेळी करत संघाला विजयाकडे नेले. या सामन्याला देशभरात मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर हा सामना खेळवला गेला.
👉 शहीदांना श्रद्धांजली
सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला –
“पहलगाम हल्ल्यातील शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आमच्या सैन्यदलाला समर्पित आहे.”
👉 हस्तांदोलन टाळले
भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवल्यानंतर, सूर्यकुमार यादवसह भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता त्यांना धडा शिकवला. पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर थांबले असतानाही भारतीय संघाने सामन्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
या विजयामुळे भारताचे आशिया कप 2025 सुपर-4 फेरीत जवळपास स्थान निश्चित झाले आहे.