नवी दिल्ली | देशाच्या उत्तरेकडील भागात यंदा मॉन्सून थांबायचं नाव घेत नाहीये. मुसळधार पावसाने अनेक राज्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीर या डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलन, पुर आणि ढासळलेले रस्ते यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
पंजाबात मृतांचा आकडा ५१ वर
पंजाबातील पूरस्थिती अधिक गंभीर झाली असून मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला आहे. रविवारी तो ४६ होता. सलग आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या असून हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. राज्य सरकारच्या माहितीनुसार, बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
हवामान खात्याचा अलर्ट
दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिल्ली-एनसीआरमध्ये आज आंधी, पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. तसेच दक्षिण-पश्चिम राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्येही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.
पंतप्रधान मोदींचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेश आणि पंजाब दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी १.३० वाजता ते कांगडा, हिमाचल प्रदेशात पोहोचून अधिकाऱ्यांशी बैठक घेतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता ते पंजाबातील पूरग्रस्त भागांचा हवाई सर्वेक्षण करतील.
नुकसानाचे प्राथमिक अंदाज
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमन अरोरा यांनी केंद्र सरकारकडून मदत पॅकेजची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पंजाबमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज तब्बल २०,००० कोटी रुपये इतका आहे. तर पंजाब BJP अध्यक्ष सुनील जाखड यांनी सांगितले की पंतप्रधान मोदींना परिस्थितीबाबत गहन चिंता असून स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना अधिकाधिक मदत मिळेल याची काळजी घेतली जाईल.