पाली (10 सप्टेंबर) – अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता विजयी झाले आहेत. 15 पैकी 9 मते मिळवत त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांचा पराभव केला. तर एक मत तटस्थ राहिले.
सुरुवातीला तिरंगी लढतीचे चित्र होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत मेहता यांना पाठिंबा दिला. अखेरच्या क्षणी झालेल्या या राजकीय हालचालींमुळे भाजप-राष्ट्रवादी आघाडीला बळ मिळाले. निवडणुकीच्या निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा झाला.
या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीला महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठता आला असून आगामी काळात पाली नगरपंचायतीचे राजकारण याच निकालाच्या छायेत ठरणार आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीच्या शाश्वत विकासाची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, भाजप नेते वैकुंठ पाटील, प्रकाशभाऊ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
.
