मुंबई | गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देवाभाऊ’ शीर्षकाची जाहिरात झळकली. काही ठिकाणी फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी पुष्प अर्पण करताना दिसत होते, तर काही ठिकाणी ते गणपती बाप्पाला वंदन करताना दाखवले गेले. या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि सरकारवर जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
“तुम्ही 40 कोटी, 400 कोटी किंवा 4000 कोटींच्या जाहिराती दिल्या तरी आम्हाला हरकत नाही. पण या निनावी जाहिराती नेमक्या का दिल्या गेल्या? याबाबत आमचा आक्षेप आहे,” असे रोहित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “जर या जाहिराती सरकारने दिल्या असतील, तर एका बाजूला पैसे नसल्याचे कारण देऊन योजना बंद केल्या जात आहेत, कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत आणि काहीजण आत्महत्या करत आहेत. अशा वेळी कोट्यवधींच्या जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?”
“90 कोटींचा दंड माफ केलेल्या कंपनीने जाहिरात दिली का?”
रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजपने जाहिरात दिली असेल तर नावाने का दिली नाही? नाही दिली, तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षातील अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून दिली का? उदाहरण द्यायचं झालं तर, ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांचा दंड महसूलमंत्री म्हणून तुम्ही माफ केला होता, त्या कंपनीने या जाहिराती दिल्या का?”
याशिवाय, “जर या जाहिरातींमध्ये काहीही काळेबेरं नसेल, तर एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिराती कुणी दिल्या हे जाहीर करा,” असे आव्हानही पवारांनी दिले.